‘कोरोना’ला अटकाव, लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु

बिजिंग : वृत्तसंस्था – संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणाला अटकाव घालण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही ठिकाणी लसीच्या चाचण्या घेण्यास सुरुवात झाली आहे. चिनी संशोधकांनी कोरोना विषाणूवरील लसीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु केली आहे. चायनिज अ‍ॅकेडमी ऑफ मेडिकल सायन्सेस मधील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल बायोलॉजीने रविवारी ही माहिती दिली. या चाचणीदरम्यान लसीचे प्रभावीपणा आणि सुरक्षितता तपासली जाणार आहे.

कोरोना विषाणूची साथ वेगाने फैलावत असून, जग नव्या व धोकादायक टप्प्यात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्याचवेळी जगभरात विविध ठिकाणी कोरोना विषाणूवरील लसीची मानवी चाचणी विविध टप्प्यांवर होत आहे. मात्र, लसीची कोणतीही चाचणी व्यापक प्रमाणात पोहोचलेली नाही.

चीनमधील संशोधकांनी शनिवारी दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु केली आहे. सहा संभाव्य लसींची चाचणी चिनी संशोधक मानवावर घेत आहेत. यापूर्वी मे पासून पहिल्या टप्प्यात 200 जणांवर चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल बायोलॉजीने रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये लसीचा डोस निश्चित केला जाईल, तसेच संभाव्य लस निरोगी शक्तीच्या शरीरात सुरक्षितपणे प्रतिकारशक्ती वाढवते का, हे पाहण्यात येणार आहे.