गौरवास्पद ! हुंडा म्हणून मिळालेले 11 लाख CISF च्या जवानानं केले परत

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कायद्याने हुंडा देण्यास बंदी असली तरी अजूनही तो दिला घेतला जातो. सीआईएसएफचे जवान जितेंद्र सिंह यांचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला. जेव्हा वधुचे पिता टिळ्याच्या वेळी वधुपिता थाळीत ११ लाख रुपये घेऊन आले. तेव्हा जितेंद्र सिंह यांनी त्यांना हात जोडून ती परत केली. नवरदेवाने थाळी परत केल्याचे पाहून वधुपिता घाबरले. आपल्याकडून काही कमी राहिली का असे त्यांना वाटले. पण, जितेंद्र सिंह यांनी आपण हुंड्याच्या विरुद्ध असून भारतातून ही कुप्रथा नष्ट झाली पाहिजे, असे सांगितले. तेव्हा लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात जितेंद्रसिंह यांच्या या निर्णयाचे स्वागत केले.

जितेंद्र यांची पत्नी चंचल ही एलएलबी आणि एलएलएम झाली असून तिला पीएचडी करायची आहे.
याबाबत जितेंद्र सिंह यांचे वडिल राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, आम्ही टिळ्याचे ११ लाख रुपये परत करुन आपल्या स्तरावर समाजातील ही कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. माझी सून मला मुली समान आहे. तिचे गुणच आमच्यासाठी हुंडा आहे. आम्हाला वाटते की तिने आणखी खूप शिकावे. चंचल हिला शिकण्यासाठी माझा सर्व परिवार तिच्याबरोबर आहे.

जितेंद्र सिंह याने सांगितले की, देशाचा सैनिक असण्याच्या नात्याने मी सांगू इच्छितो की देशातील युवकांनी हुंडा प्रथेला विरोध केला पाहिजे. हुंड्याच्या कारणावरुन लोक आपल्या मुलींना मारुन टाकतात. मुलामुलींमध्ये फरक करु नये.

चंचलचे वडिल गोविंदसिंह शेखावत यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी पैसे परत केले तेव्हा मी घाबरुन गेलो होतो. सुरुवातीला मला वाटले की लग्नाच्या व्यवस्थेवर ते नाराज आहे का. नंतर समजले की ते हुंडा प्रथेविरोधात आहेत.

Visit : Policenama.com