बॉम्बस्फोटांनंतरचे पडसाद ; श्रीलंकेत दोन समुदायांमध्ये उसळली ‘दंगल’

कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेमधील नेगोंबोमध्ये स्थानिक सिंहली आणि मुस्लिमांदरम्यान दंगल उसळली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात संचार बंदी लागू केली आहे. तसेच अफवा पसरू नये म्हणून सोशल मीडियावर बंदी घातली आहे. श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये नेगोंबोतील एका चर्चचाही समावेश होता.

श्रीलंकन सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर सुमित अटापट्टू यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अधिकारी शहरातील शाळा पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत असताना दंगल उसळली. समाजकंटकांनी मोटारसायकल, कारच्या काचा फोडल्या. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या भागावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने विशेष सुरक्षा दलाला पाचारण केले असून पोलीस तपास करत आहेत.

रविवारी २१ तारखेला ऐन इस्टर संडे दिवशी श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरली होती. त्या बॉम्बस्फोटांचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काल रविवारी श्रीलंका सरकारने ६०० विदेशी नागरिकांसह २०० मौलानांना देशाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. अनेक मौलाना श्रीलंकेत बेकायदेशीररित्या देशात आले होते. हल्ल्यानंतर त्यांच्या व्हिजाची तारीख उलटली होती तरी ते देशात स्थायिक झाले होते. त्यंच्यावर दंड आकारून त्यांना देशाबाहेर काढण्यात आले आहे. त्यांनतर आता स्थानिक सिंहली आणि मुस्लिमांदरम्यान दंगल भडकली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये दोन समुदायांमध्ये झालेला हा पहिला प्रकार होता.

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट –

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टर संडे साजरा होत असताना शँग्रिला, किंग्सबरी आणि सिनामन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, बट्टीकलोआ चर्च, सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या साखळी बॉम्बस्फोटांत ३५९ लोक मृत्युमुखी पडले तर ३ पाचशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. नऊ आत्मघाती हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यात महिलेचाही समावेश होता. त्यातील आठ हल्लेखोरांची ओळख पटली आहे. आतापर्यंत साठ श्रीलंकेच्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यातील ३२ जण फौजदारी तपास पथकाच्या कोठडीत आहेत. अटक करण्यात आलेले बहुतेक जण ‘नॅशनल तोहीद जमात’ या संघटनेशी संबंधित आहेत.

Loading...
You might also like