मुख्यमंत्र्यांकडून अधिवेशन रद्द करण्याचा विचार

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या भारत पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा आढावा बैठक बोलावली होती. या आढावा बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या बैठकीला पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल उपस्थित होते.

मुंबई आणि महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सध्या सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या राज्याच्या अधिवेशनाच्या बंदोबस्तात पाच हजार पोलिस तैनात आहेत. याशिवाय अधिवेशनावर येणाऱ्या मोर्चांसाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर हा पोलिस बंदोबस्त इतरत्र वापरता यावा यासाठी अधिवेशन रद्द करण्याचा विचार सुरु आहे.

अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील आमदार विधानभवनात परिसरात असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येतो. सर्व व्हीआयपी एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर जास्त संवेदनशील होत असल्याचंही म्हटलं जात आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विधिमंडळात बोलवण्यात आली आहे. सर्वांशी चर्चा करुन अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. देशातील परिस्थिती पाहता अधिवेशन उद्याच रद्द करण्याची सरकारी पक्षाचीही भूमिका आहे.