काय सांगता ! होय, डॉक्टरांची चिठ्ठी असल्यास मद्यपींना मिळणार दारू, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे केरळमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मागील काही दिवसांपासून केरळमध्ये नागरिकांंना दारु न मिळाल्यामुळे आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. मद्यपींनी आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या काही दिवसात केरळमध्ये घडल्या. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यांच्याकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल त्यांना दारू देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.

लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता या काळात सर्व वस्तूंची दुकाने ही बंद आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच कोंडी झाली. सगळीकडे दारुची दुकाने बंद असल्यामुळे, गेल्या 5 दिवसांमध्ये 5 तळीरामांनी आत्महत्या केल्या होत्या.

राज्यात विविध भागात मद्यपींच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी मद्यपींना दिलासा दिला आहे. दारूचे व्यसन जडलेल्यांना दारू देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल अशा मद्यपींना दारू विक्री करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजयन यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर दारूच्या आहारी गेलेल्यांना मोफत उपचार करण्यात यावे असेही नमूद केले आहे. विशेष बाब म्हणजे दारूच्या टंचाईमुळे काही नवीन सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकार ऑनलाईन दारू विक्रीच्या पर्यायाचा विचार करत आहे, असंही विजयन यांनी सांगितले आहे.