खाते वाटपाचा तिढा सुटला ? ‘या’ तारखेला होणार ‘मंत्रिमंडळा’चा विस्तार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. सरकार स्थापन झाले असले तरी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी दरम्यान शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. अखेर सरकारमधील खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये खातेवाटपाबाबत एकमत झाले आहे. येत्या 9 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राजभवनावर या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत सहा मंत्र्यांना तुर्तास खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नऊ दिवस झाले मात्र अजुनही खातेवाटप जाहीर केले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या बैठकीत खातेवाटपामध्ये फार दिरंगाई नको, खातेवाटप लवकर जाहीर करावे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. तसेच गृहविभाग तुर्तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असावे, असा सूरही या बैठकीत पाहण्यास मिळाला. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अजून काही खात्यावरून स्पष्टता होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा तीन पक्षाचे नेते चर्चा करणार असल्याचे समजतेय.

Visit : Policenama.com