उध्दव ठाकरे अन् राज्यपाल एकाच व्यासपीठावर, मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना संसर्गाचे संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल सदस्य आमदार नियुक्तीवरून राजकीय पेच निर्माण झालायं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नियुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतल्यामुळे राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर आज मुख्यमंत्री आणि राज्यपाल एकाच व्यासपीठावर दिसणार आहे.

हायकोर्टातील मुख्य न्यायमूर्ती दिपाशंकर दत्ता यांचा आज रात्री शपथविधी राजभवनावर आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. या वेळी उद्धव ठाकरे आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यात राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होणार आहे. त्याच सोबत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधान परिषद या दोघांपैकी एका सभागृहाचं सदस्य बनणे आवश्यक आहे. यामुळे या प्रस्तावात उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेचे सदस्य बनवण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

मात्र, उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्यांच्या कालावधी पुढील महिन्यातील २८ मे रोजी संपत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावरती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केलेली नाही. त्यामुळे कोरोना संसर्गासारख्या संकटा दरम्यान विरोधक राजकारण करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

याबाबत सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त करण्याबाबतच्या प्रस्तावावर पुन्हा चर्चा झाली. राज्यपालांना प्रस्तावाचे स्मरण करून देण्यात आले. या संदर्भात नवीन किंवा सुधारित प्रस्ताव करण्यात आलेला नाही. पूर्वीच्याच प्रस्तावाचं स्मरण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.