वाराणसी : उष्णतेपासून बचावासाठी चक्क देवाला अर्पण केलं ‘कोल्ड ड्रिंक’

वाराणसी : वृत्तसंस्था – उत्तर भारतात उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे की, सर्वसामान्यांव्यतिरिक्त आता देवालाही उष्णता जाणवत आहे. हे लक्षात घेत वाराणसीतील भक्त त्यांच्या देवाला कोल्ड ड्रिंक अर्पण करत आहेत, सोबतच एसी आणि पंख्याची देखील व्यवस्था करत आहेत.

वास्तविक, काशीमध्ये असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या आणि चॉकलेट देवाच्या आवारात अर्पण करण्यासाठी ठेवले आहेत. काशीमधील भगवान शंकर यांच्या आठ रूपांपैकी एक असलेल्या बाबा बटुक भैरवचे मंदिर लॉकडाऊन दरम्यान भाविकांसाठी बंद आहे, तर मंदिराचे सेवक आणि पुजारी कोल्ड ड्रिंक आणि चॉकलेट अर्पण करत आहेत.

याचे कारण उष्णता शिगेला पोहोचली असून वाराणसी मधील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. बाबा बटुक भैरव दरबारचे सेवक विश्वजित बागची म्हणाले की, बाबा बटुक भैरवसाठी एअर कंडिशनर, पंखा आणि एक्झॉस्ट फॅन बसवण्यात आले आहेत. इतर मंदिरांमध्येही थंड होण्याची व्यवस्था केली गेली आहे.

लॉकडाऊनमुळे मंदिर बंद आहे, पण थोडीशी सवलत मिळाल्यावर मंदिराचे सेवक आणि मंदिरात येणाऱ्या सेवकांकडून बाबांची सेवा केली जात आहे. बाबा बटुक भैरव हे शंकराचे बाल रूप असून त्यांना अंडी, मांस, मासे, दारू देखील अर्पण केली जाते. भाविकांकडून इतर दिवशी ज्याप्रमाणे चॉकलेट आणि टॉफी अर्पण केली जाते, त्याचप्रमाणे उन्हाळ्यात बटुक भैरव यांना कोल्ड ड्रिंक अर्पण केले जाते.

मात्र, हे प्रत्येक वेळी उन्हाळ्यात केले जाते जेणेकरून बाबांना गरम होऊ नये आणि त्यांचा आशीर्वाद राहील. आणखी एक सेवक राजेशने सांगितले की, इकडे उष्णता खूप वाढत आहे आणि उष्णतेपासून बाबांना मुक्त करण्यासाठी सर्व प्रकारच्या थंड गोष्टी आणि कोल्ड ड्रिंक्स बाबांना अर्पण केले जात आहेत.

मुलांना आवडणारी प्रत्येक गोष्ट बाबा बटुक भैरव यांना अर्पण केली जाते आणि नंतर त्याचे परत भक्तांमध्ये किंवा मुलांमध्ये वाटप केले जाते.