प्रविण तरडे यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   अभिनेता प्रवीण तरडे भारतीय संविधानावर गणपतीची प्रतिष्ठापना केल्याचे प्रकरण आता न्यायालयात गेले असून, संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी प्रविण तरडे यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरती जमदाडे यांच्यावतीने अ‍ॅड. वाजेद खान बीडकर यांनी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार, तरडे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाला प्रसिध्दी मिळावी यासाठी हे कृत्य केल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यामुळे सविधांनाचा अवमान केल्याप्रकरणी 153 नुसार त्यांच्यावर इश्यू प्रोसेसचा आदेश होऊन न्यायालयात खटल्याकामी हजर होण्याचे आदेश करण्यात यावे, अशी मागणी फौजदारी तक्रारीत करण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान हा प्रकार झाल्यानंतर सोशल मीडियावर देखील प्रवीण तरडे यांच्यावर नेटिझनकडून तीव्र निषेध नोंदवत टिका करण्यात आली होती. यानंतर त्यांनी तात्काळ गणेशाची प्रतिष्ठापना बदलली होती.