मनसेचा नवा झेंडा ‘वादात’, संभाजी ब्रिगेडची पुणे पोलिसांकडे ‘तक्रार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्मण सेनेने आजच्या महाअधिवेशनामध्ये पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. मनसेच्या नवा झेंडा संपूर्ण भगवा असून त्याच्या मध्यभागी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण झाल्यानंतर भाजपचे रावसाहेब दानवे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे नव्या झेंड्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या झेंड्याला विविध शिवप्रेमी संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या आक्षेपानंतर या झेंड्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज केला आहे. संभाजी ब्रिगेडने पुण्यात सहायक आयुक्त सर्जेराव बाबर यांच्याकडे हा अर्ज केला आहे. या अर्जामध्ये संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे की, राजमुद्रेचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे चुकीचे आहे. तसेच राजमुद्रेचा झेंड्यात वापर करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राज ठाकरे यांना नाही. मनसेने राजमुद्रेचा वापर केल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

तक्रार अर्जात पुढे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही शिवरायांची प्रशासकीय मुद्रा आहे. याच राजमुद्रेचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. शिवरायांच्या प्रशासनाचे प्रतिनिधीत्व करणारी राजमुद्रा ही रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्त्व करणारी आहे. तिचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे चुकीचे असून प्रांत, भाषा, जात-धर्म यावर अधारित राजकारण करणाऱ्या मनसे राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही अधिकार नाही. यामुळे शिवप्रमींच्या भावना दुखावल्या असून राज ठाकरे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असे अर्जात म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –