भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी पराभूत काँग्रेस उमेदवारावर गुन्हा दाखल

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – अकोट तालुक्यातील मोहाळा येथील भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पराभूत काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राजकीय कारणावरुन हे हत्याकांड झाल्याचा संशय प्रथम व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हा प्रकार लहान मुलांच्या भांडणावरुन झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर स्पष्ट झाले.

भाजपा अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीनखॉ शेरखॉ पटेल (वय ४८) यांच्याबरोबर मोहाळा गावातील काँग्रेस पक्षाशी संबंधित पटेल गटाच्या लोकांशी शुक्रवारी सायंकाळी वादावादी झाली़. लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन हा वाद झाला असला तरी त्याला राजकीय वादाची किनार होती. हिदायत पटेल व त्यांच्या साथीदारांनी मतीन पटेल यांच्यावर हल्ला केला. त्यात मतीन पटेल यांचा मृत्यु झाला. यावेळी मुमताज पटेल (वय ५५) याही गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर अकोला येथे उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे सुरुवातीला हा प्रकार राजकीय कारणावरुन झाल्याचे भासविले गेल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. भाजपा, काँग्रेससह वरिष्ठ नेते, पोलीस अधिकाऱ्यामध्ये गोंधळ दिसून आला. त्यात या घटनेनंतर हिदायत पटेलसह सर्व जण पळून गेल्याने तणावात आणखीच भर पडली होती. अकोट ग्रामीण पोलिसांनी वेळीच घटनास्थळावर धाव परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात तणावपूर्ण शांतता असून एसआरपीएफ तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, अकोला येथे जाऊन पोलिसांनी मुमताज पटेल यांची फिर्याद घेतली. त्यात त्यांनी लहान मुलांच्या भांडणाचे कारणावरुन हिदायत पटेल व इतरांनी घरात शिरुन मारहाण केल्याचे सांगितले. तेव्हा नेमके कारण स्पष्ट झाल्याने तणाव निवाळला. पोलिसांनी हिदायत पटेल व त्याच्या १० साथीदारांविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.