मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका रजनी केणी यांनी ही तक्रार दाखल असून असून पिठासीन अधिकारी म्हणून महापौर पेडणेकर यांनी रजनी केणी यांचे मत अवैध ठरवले होते. याच मुद्यावरून आता रजनी केणी यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

महापौरांनी माझं मत अवैध ठरवलं. तसंच मतदारांनी मतपत्रिका दाखवण्याचा आग्रह धरुनही मत पत्रिका दाखवली नाही. नंतर मात्र वृत्तपत्रात माझी सही अवैध ठरवण्यात आल्याची माहिती दिली, असं केणी यांचे म्हणणे आहे. भाजप नगरसेविकेनं थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रजनी केणी यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना देखील याबाबत पत्र पाठवलं आहे.

काय आहे हे प्रकरण ?
मुंबई महापालिकेत शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करत 12 प्रभाग समित्यांमध्ये विजय मिळवला आहे. गेल्यावेळी शिवसेनेकडे 8 प्रभाग समित्या होत्या, तर भाजपकडे 9 प्रभाग समित्या होत्या. या वर्षीच्या निवडणुकांमध्य मात्र काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने 4 प्रभाग समित्या जास्त मिळवत एकूण 12 प्रभाग समित्या आपल्या ताब्यात घेतल्या.

मुख्य म्हणजे भाजपचे खासदार मनोज कोटक हे ज्या प्रभाग समितीचे सदस्य आहेत, तिथल्या निवडणुकीत समसमान मते पडण्याची शक्यता होती. अशावेळी चिठ्ठीद्वारे प्रभाग समिती अध्यक्ष निवडला गेला असता. पण निवडणुकीत भाजपचे एक मत अवैध ठरवण्यात आले. यावर भाजपने आक्षेप घेतला. मात्र त्यांना मतपत्रिका दाखवण्यात आल्या नाही. त्यामुळे शिवसेनेने फसवणूक करुन प्रभाग समिती जास्त मते मिळवली असा आक्षेप भाजपने घेतला आहे.