मोदींच्या योगमुद्रा शेअर करत काँग्रेसने साधला ‘निशाणा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनासोबत अनेक समस्या उभ्या राहिल्या असून चीन व नेपाळ या राष्ट्रांकडून सुरू असलेली घुसखोरी, इंधन दरवाढ या सगळ्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पद्धतीने बघतात, असे सांगत काँग्रेसने मोदींच्या वेगवेगळ्या योगमुद्रा शेअर करत टोला लगावला आहे.

लॉकडाउनमुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात असताना सीमेवरील तणाव वाढत चालला आहे. नेपाळने नकाशात बदल करत काही भारतीय भूभाग स्वतःच्या हद्दीत दाखवला आहे. तर चिनी सैन्याने गलवान खोर्‍यात घुसखोरी केली होती. या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यावरूनही देशातील वातावरण तापले आहे. त्याचबरोबर इंधन दरवाढीने सर्वसामान्यांच्या समस्यांमध्ये भर टाकली आहे.

या सगळ्या मुद्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पद्धतीने बघतात, यावरून काँग्रेसने मोदी यांच्या काही योग मुद्रा शेअर करून टीका केली आहे. काँग्रेसने एक फोटो ट्विट केला असून वेगवेगळ्या परिस्थिती वेगवेगळी प्रतिक्रिया, असे म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे. नेपाळ, चीन सीमावाद, इंधनदरवाढ याबरोबरच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने व्हर्च्युअल रॅली आयोजित केली होती. त्यावरूनही काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदी इतर मुद्यांवर मौन बाळगून आहेत, तर बिहार विधानसभा निवडणुकीबद्दल सक्रिय आहेत, अशी टीका काँग्रेसने फोटोतून केली आहे .