Pune : रेमडेसिवीर इंजक्शनचा तुटवडा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे : काँग्रेस शहर प्रवक्ते रमेश अय्यर यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमेडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पुण्यातही तीव्रतेने जाणवू लागला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने उत्पादक कंपन्या, वितरक यांच्याशी संपर्क साधून इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर प्रवक्ते, सरचिटणीस रमेश अय्यर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

कोरोना रुग्णावर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन अत्यंत गरजेचे असते. राज्याच्या ग्रामीण भागात किंवा औरंगाबादसारख्या शहरात या इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातही तुटवडा जाणवू लागला आहे. पुण्यात कोरोनाची साथ टोकाला गेली आहे शिवाय राज्याच्या अनेक भागातून कोरोनाचे रुग्ण पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाची प्रचंड धावपळ होते, ते असहाय्य होतात. अशाप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, असे रमेश अय्यर यांनी पत्रकात म्हटले आहे.

इंजेक्शनच्या तुटवड्याचा गैरफायदा घेऊन काळाबाजार जर कोणी करीत असल्यास प्रशासनाने त्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी अय्यर यांनी केली आहे.