देशद्रोहाचा गुन्हा : हार्दिक पटेलांना पुन्हा एकदा अटक

अहमदाबाद : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. कोर्टानं त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक झाली आहे. विरमगावजवळील हासलपूर येथून त्यांना ताब्यात घेतलं आहे. हार्दिक यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करत 24 जानेवारी रोजी त्यांना कोर्टात हजर रहाण्यास सांगितलं होतं. त्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली आहे. उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

25 ऑगस्टर 2015 साली पाटीदार आरक्षणासाठी अहमदाबादमध्ये जीएमडीसी मैदानावर विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सभेनंतर गुजरातमध्ये विविध ठिकाणी हिंसाचार उसळला होता. यात अनेक सरकारी वाहनं, पोलीस चौक्या जाळण्यात आल्या. सरकारी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. पोलीस गोळीबारातही डझनभर लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यात एका पोलिसालाही आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये हार्दिक पटेल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीला हार्दिक पटेल वारंवार गैरहजर रहात असल्यानं अहमदाबादच्या कोर्टानं त्यांच्याविरोधात अजामीनपत्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

या प्रकरणी हार्दिक यांना हाय कोर्टाकडून सशर्त जामीन मिळाला होता. खटल्याच्या सुनावणीत सहकार्य करण्याबाबत कोर्टानं त्यांना बजावलं होतं. कोर्टाच्या सुनावणीस ते वारंवार गैरहजर असल्यानं त्यांना अटक झाली आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात असा आरोप केला आहे की, हार्दिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकनियुक्त सरकार हटवण्यासाठी हिंसाचार भडकवण्याचं षडयंत्र रचलं. या प्रकरणी अहमदाबादच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून आजच्या सुनावणीला हार्दिक गैरहजर राहिल्यानं न्या. बी. जे. गणात्रा यांनी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणी 24 जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like