Phone Tapping : नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार, म्हणाले – ‘आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो’

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं. भाजपसह इतर पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत. अशातच भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेस अस्तित्वहीन पक्ष असल्याची टीका करत काँग्रेसला किती वाटा मिळाला अशी टीका केली. फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला. सगळं विकून देश चावलत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभे केले, असे नाना पटोले म्हणाले.

RSS ला वाटा पुरवला

नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करताना म्हटले, आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो. वाटा आणि घाटा हे फडवीसांच्या सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिले आहे. RSS ला कसा वाटा पुरवला गेला होता. आरएसएसची लोकं कशी मंत्रालयात होती, किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करण्यास सांगणार आहोत, असे सांगितले.

भ्रष्टाचारीच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत

जे भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं आहे, असे पटोले यांनी सांगितले. शेतकरी आंदोलन, लसीकरणापासून भारताला वंचित ठेवले आहे. महागाईच्या मुद्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी ही व्यूहरचना रचल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

पाकिस्तान धार्जिण केंद्र सरकार

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना अजूनही केंद्राकडून अपुऱ्या पद्धतीने लस पुरवली जात आहे. एकीकडे केंद्रातील सरकार पाकिस्तान धार्जिण होऊन पाकिस्तानला लस पुरवत आहे. पण महाराष्ट्राला आणि देशातील गरीबाला लस दिली जात नाही. या मूळ प्रश्नांवरुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचे पटोले यांनी सांगितले.

देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला

नाना पटोले पुढे म्हणाले, या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, देशाला विकून देश चालवणारे लोक काँग्रेसला वाट्याचं सांगत आहेत. फडणवीस सरकारमध्ये जे पाप झाले ते राज्य सरकारने उघडकीस करावं. परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहित असून वाटा भाजपवाले कसा घेतात हे जनतेला माहिती असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

राजभवन हे भाजपचे कार्यालय

राज्यपालांवर टीका करताना पटोले म्हणाले, राजभवन हे भाजपचे कार्यालय झाले असून राज्यपालांची भुमिका संशयास्पद आहे. त्यांनी काय अहवाल द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो ठेका घेताल आहे त्याला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

फडणवीस न्यायाधीशाची भूमिका निभावत होते

परमबीर सिंह दोषी आहेत की, अनिल देशमुख हे पहावे लागेल. फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायाधीशाची भूमिका निभावत होते. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ते क्लीन चीट देत होते. त्यावेळी त्यांनी का नाही घेतले राजीनामे, असा प्रश्न विचारत ते म्हणाले, राजकारणात आरोप होत असतात पण सत्यता न तपासताच राजीनामा घेणे चुकीचे असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.