नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना टोला; ‘भानावर या, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालांचे?’

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोना प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. ‘चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष कोरोना लसींच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. त्यांनी भानावर येऊन ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालांचे याचे उत्तर द्यावे’, असे नाना पटोले म्हणाले.

काँग्रसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर चंद्रकात पाटील यांनी टीका केली होती. त्याचा समाचार नाना पटोले यांनी घेतला. ते म्हणाले, ‘काँग्रसचे नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. त्यांनी भानावर येऊन ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालांचे याचे उत्तर द्यावे’.

तसेच ‘केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण देशाला कोरोनाच्या खाईत ढकलले आहे. ऑक्सिजन, इतर आवश्यक औषधे आणि उपकरणांच्या कमरतेमुळे कोरोना रूग्ण तडफडून मरताहेत. अशा गंभीर परिस्थितीत सरकारसोबत मिळून लोकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी भाजपचे नेते हीन राजकारण करत आहेत, असेही पटोले म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पुरेशी मदत मिळत नाही. तरीदेखील कोरोनाविरोधातील लढाई महाराष्ट्र पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. देशातील भाजपशासित राज्यांपेक्षा महाराष्ट्र कोरोनाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने मुकाबला करत आहे. काँग्रेस नेत्यांचे सल्ले वेळीच ऐकले असते तर आज देशाचे स्मशान झाल्यासारखी परिस्थिती नक्कीच निर्माण झाली नसती, असे नाना पटोले यांनी सांगितले.