कन्हैया कुमारवर राजद्रोहाचा खटला चालविण्यास केजरीवाल सरकारनं मंजुरी दिल्यानं पी. चिदंबरम तीव्र ‘नाराज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या केजीरवाल सरकारने कन्हैया कुमार याच्या विरोधात राजद्रोहाचा खटला चालण्याला मंजुरी दिली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिल्ली सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राजद्रोहाच्या कायद्याबाबत केंद्र सरकारप्रमाणेच दिल्ली सरकारला देखील समज कमी आहे अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मी भारतीय दंड विधान कलम १२४ अ आणि १२० ब अंतर्गत कन्हैया कुमार याच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला चालवण्यास मंजुरी देण्याला मी तीव्र विरोध करत आहे असं काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट केलं आहे.

माझ्या विरोधात राजद्रोहाचा खटला चालवण्याला मंजुरी दिल्याबद्दल मी दिल्ली सरकारला धन्यवाद देतो. हे प्रकरण गंभीरपणे घ्यावे अशी मी दिल्ली पोलिस आणि वकिलांना आग्रह करतो. टीव्हीवाल्या ‘आपकी अदालत’ च्या जागी कायद्याच्या ‘अदालत’मध्ये न्याय मिळावा. सत्यमेव जयते, अशा शब्दांत कन्हैया कुमार याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राजद्रोहाच्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट आणि त्वरित कारवाईची आवश्यकता आहे.यामध्ये देशद्रोह कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो हे देशाला समजू शकेल असं आणखी एका ट्विटमध्ये कन्हैया कुमार म्हणाला.

हे आहे प्रकरण
कन्हैया कुमार चा एक व्हिडिओ ९ फेब्रुवारी २०१६ ला समोर आला त्यामध्ये व्हिडिओत कथिक स्वरुपात देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर कन्हैया कुमार आणि इतर काहींच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. मात्र सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने या खटल्यासाठी दिल्ली सरकारकडून परवानगी मिळाली नसल्याची माहिती कोर्टाला दिली होती.

त्यानंतर दिल्ली सरकारची भूमिका काय आहे ते स्पष्ट करावे असे आदेश कोर्टाने दिल्ली शाखेच्या विशेष पथकाला दिले होते. विशेष शाखेने पत्र पाठवल्यानंतर आता सरकारने राजद्रोहाचा खटला चालवण्याची अनुमती दिली आहे. यामुळे आता कन्हैया कुमारविरोधात राजद्रोहाचा खटला चालणार आहे.