पृथ्वीराज चव्हाण यांना ‘हायकमांड’नं दिला ‘हा’ आदेश, सातारा लोकसभेचं चित्र स्पष्ट

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा लोकसभा पोटनिवडणुक लढवण्याच्या मनस्थितीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना हायकमांडने निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साताऱ्याची ही लढत रंगणार असून यामध्ये कोण बाजी मारतो याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. हायकमांडच्या आदेशामुळे पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने घटस्थापनेचा मुहुर्त साधत आपल्या 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव नसल्याने ते सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. अखेर आज हायकमांडनेच पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिल्याने साताऱ्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उदयनराजे भोसले यांना शह देण्यासाठी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना रिंगणात उतरवले आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पण ही पोटनिवडणूक लढवण्यास पृथ्वीराज चव्हाण फारसे उत्सुक दिसत नाहीत. मात्र, आता हायकमांडनेच निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आग्रही होते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निर्णय हायकमांडला कळवला होता. त्यांनी कराड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Visit : policenama.com