काँग्रेसचे प्रवक्ता ‘संजय’ निघाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, म्हणाले – ‘व्हायरसला हलक्यामध्ये नका घेऊ, कोणाला पण होऊ शकतो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लाखाच्यावर गेली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. देशात कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लागण होत असून कोरोनाने राजकारण्यांना देखील सोडले नाही. राजकारणी नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली असून आता काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता संजय झा हे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी ही माहिती स्वत: ट्विट करून दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. माझ्यात कोणतेही लक्षण नाही. मला पुढील 10 ते 12 दिवसांसाठी घरात क्वारंटाईमध्ये रहावे लागणार आहे. कृपया कम्युनिटी ट्रांसमिशनमध्ये सावधानता बाळगा. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोना विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने सोशल डिस्टन्सिंग हाच एक एकमेव पर्याय सध्यातरी आहे. त्यामुळे नगारिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.