Nana Patole : भाजपामध्ये नरेंद्र मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  एकीकडे देशात कोरोनाची दुसरी लाट आली असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक परस्परावर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलं आहे. भाजपामध्ये पंतप्रधान मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय याचा आम्हाला आनंद आहे. असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले हे मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, कोरोनामुळे देशभरात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होत असताना पंतप्रधान मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही. मोदींच्या जागी नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवे होते. असे विधान नाना पटोले यांनी केलं आहे. तर मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, परंतु आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही असे देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

पुढे नाना पटोले म्हणाले, शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’ असून शेतकरी विरोधी ३ काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांचे दर देखील वाढवून शेतक-यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. २ दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी नाहीतर काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशारा देखील पटोले यांनी दिला आहे. या दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. म्हणजेच मोदी अपयशी ठरले आहेत हे आता भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. यावरून भारतातील नागरिकांच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते देखील समजेल, असा टोला सुद्धा पटोले यांनी लगावला आहे.