सोनिया गांधी यांना पाठवले आणखी एक पत्र

पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेसच्या नेत्यांकडून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना आणखी एका पत्राचा बॉम्ब फोडण्यात आला आहे. हे पत्र उत्तर प्रदेशातून पाठवण्यात आले आहे. काँग्रेसच्या 9 वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष चालवावा, असा सल्ला त्यांनी पत्रातून दिला आहे.

काँग्रेसला आता घराणेशाहीच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊन काम करावे लागेल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्रावर माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भुधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे , स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांनी स्वाक्षरी केली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवस्था सगळ्यात वाईट आहे असे पत्रात लिहिले आहे. काँग्रेसमध्ये ढिसाळ कारभार सुरू असल्याचे नेत्यांनी स्पष्टपणे लिहले आहे. राज्यामध्ये कसा कारभार सुरू आहे याची माहिती तुम्हाला प्रभारींकडून मिळत नाही. आम्ही आपल्याला भेटण्यासाठी गेल्या एका वर्षापासून मागणी करत आहोत. पण आम्हाला नकार दिला गेला. काही मंडळी ही वेतन तत्त्वावर काम करतात आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत अशा लोकांकडे पदे आहेत, असा दावा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे.