आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

काँग्रेस कार्यसमितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. ‘लोकशाही वाचवू आणि नवाभारत घडवू’ अशी घोषणा देण्यात आली आणि आगामी विधानसभा, लोकसभा यासाठी निवडणूकपूर्व आघाड्या करण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले.
[amazon_link asins=’B014WCUHO0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04f8051f-8db5-11e8-b93b-19a2767c8261′]

काँग्रेस कार्यसमितीची बैठक पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह देशभरातून आलेल्या ३५ प्रतिनिधींनी विचार मांडले. विद्यमान केंद्र सरकार विविध समाजघटकांच्या आकांक्षा दडपत असून संस्थात्मक आक्रमणही करीत आहे. दलीत, अल्पसंख्य, आदिवासी यांचे अधिकार हिसकावले जात आहेत. या अन्यायाविरोधात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी लढा द्यावा, सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन आंदोलन करावे असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे देशात भितीचे वातावरण आहे असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. भाजपची उतरण सुरू झाली असून त्यामुळे गोंधळलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुसती भाषणे देत सुटले आहेत अशी टीका त्यांनी केली. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या काळात आर्थिक घसरण होत गेली त्याची आकडेवारी मनमोहन सिंग यांनी मांडली.

समितीने दहा कलमी कार्यक्रम मांडला आणि त्यावर आगामी काळात व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय झाला. नजीकच्या काळात राजस्थान, मध्यप्रदेश आणि काही राज्यात विधानसभा निवडणूका होत असून २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यासाठी अन्य पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले. राष्ट्रहित सांभाळून, लोकांच्या आंकांक्षांचा विचार करून आघाड्या केल्या जातील अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.