CM ठाकरेंची डोकेदुखी वाढणार, काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिले ‘नाराजी’चे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून कोरोना विरुद्ध सरकार निकराची लढाई लढत आहे. राज्यात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली असतानाच सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमध्ये सर्वच काही अलबेल असल्याचे दिसत नाही. सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत आणि ते आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले आहेत, अशी एक प्रकारची नाराजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत, असं त्यांचं व्यक्तव्य हे नाराजीचे संकेत देणारे आहेत, असे बोलले जात आहे.

सरकारमध्ये असुनही काँग्रेसला विचारात घेतले जात नाही, काँग्रेस नाराज आहे का ? असा थेट प्रश्न त्यांना विचारला असता यावर बोलताना ते म्हणाले, सहाजिकच आहे आमचेही काही प्रश्न आहेत. अपेक्षा आहेत. त्यावर काम व्हाव असं आम्हाला वाटतं. आमच्या जेव्हा एकत्र बैठका होतात त्यात आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो असं सांगत त्यांनी नाराजीचा सूर लावला.

सरकारमध्ये असतानाही ज्या अर्थी थोरात हे आमचे काही प्रश्न आहेत असे म्हणतात, यावरून काँग्रेसचं मत फारसं विचारात घेतलं जात नाही असाच अर्थ निघत असल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलं आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये असलो तरी निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नाहीत, असं म्हटलं होतं. तर राहुल गांधी यांच्या आधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नाराजी बोलून दाखवली होती. राज्यात आम्ही सत्तेत असलो तरी हे काँग्रेसचं नाही तर शिवसेनेचं सरकार आहे, असे चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. या सर्व नेत्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीत नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.