बकरी ईदच्या अगोदर लखनऊमध्ये बकरीच्या होर्डिंगवरून वाद, लिहीलं – ‘मी जीव आहे, मांस नाही’

लखनऊ : वृत्तसंस्था – ईद उल अजहा (बकरी ईद) हा मुस्लिमांचा सर्वात मोठा सण जवळ आला आहे. अशा परिस्थितीत लखनऊच्या कैसरबाग परिसराच्या मुख्य चौकात होर्डिंगवर लावलेल्या बकरीच्या चित्रामुळे वाद निर्माण झाला आहे. या होर्डिंगमध्ये एक बकरीचा फोटो आहे. ज्यावर असे लिहिले आहे की – मी जीव आहे मांस नाही, आमच्याबद्दलचा दृष्टीकोन बदलावा. मुस्लिम धर्मगुरू मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी सांगितले आहे की, ईद लवकरच येणार आहे. या निमित्ताने मुस्लिम समाजातील लोक बकऱ्याचा बळी देतात. अशा वेळी हे होर्डिंग लावण्याचा अर्थ धार्मिक भावना दुखावण्याचा आहे.

अशा होर्डिंगमुळे वातावरण बिघडू शकते, म्हणून ते त्वरित हटवावेत, असे आवाहन त्यांनी पोलिस आयुक्तांना केले. त्यानंतर लखनऊच्या पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी होर्डिंग काढले. मात्र हे होर्डिंग कोणी लावले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

यासंदर्भात माहिती देताना मौलाना खालिद रशीद फिरंगी महली म्हणाले की, ‘लखनऊमधील कैसरबाग चौकात एका मोठ्या होर्डिंगवर बकऱ्याचा फोटो लावून आक्षेपार्ह लिखाण केले आहे. यासंदर्भात इमाम ईदगाह मौलाना खालिद रशीद फिरंगी महली आणि अतहर हुसेन डायरेक्शन कोऑर्डिनेशन यांनी होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश द्यावेत अशा मागणीचे पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. कारण बकरी ईद येणार आहे आणि या निमित्ताने मुस्लिम बकरीचा बळी देतात आणि असे दिसते की मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी ही कृती केली गेली आहे.

का साजरी करतात बकरी ईद ?

इस्लाम धर्मांतर्गत दोन ईद साजऱ्या केल्या जातात. भारताबरोबरच जगातील सर्व देशातील मुस्लिम ईद साजरी करतात. ईद-उल-फितर रमजाननंतर साजरी केली जाते आणि त्याच्या ७० दिवसानंतर ईद-उल-अजहा असते, ज्याला बकरी ईद असेही म्हणतात. बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाजातील लोक नमाज पठण करतात. तसेच जनावरांचा बळी दिला जातो.

पैगंबर इब्राहिम यांच्या युगात झाली सुरुवात

इस्लामिक मान्यतेनुसार जगात १ लाख २४ हजार पैगंबर (मेसेंजर) आले. यातील एक पैगंबर हजरत इब्राहिम होते. त्यांच्याच काळात बकरी ईदची सुरुवात झाली.

ही आहे संपूर्ण कथा

इस्लामिक तज्ञ म्हणतात की, एकदा अल्लाहने हजरत इब्राहिम यांना स्वप्नात त्यांच्या सर्वात प्रिय वस्तूचा त्याग करण्याचा आदेश दिला. वयाच्या ८० व्या वर्षी हजरत इब्राहिम यांना संतान प्राप्त झाली होती. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा हजरत इस्माईल हाच सर्वात प्रिय होता. अल्लाहचा आदेश पाळणे त्यांच्यासाठी एक कठीण परीक्षा होती. एका बाजूला अल्लाहची आज्ञा होती, तर दुसरीकडे मुलाचे प्रेम होते. अशात त्यांनी अल्लाहच्या आदेशाचे पालन केले आणि अल्लाहसाठी मुलाचे बलिदान देण्याचे मान्य केले.

इस्लामचे जाणकार मौलाना हमीद नोमानी सांगतात की, हजरत इब्राहिम यांना असे वाटले की आपल्या मुलाचे बलिदान देताना त्यांचे प्रेम आडवे येऊ नये. म्हणून त्यांनी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली. यानंतर हजरत इब्राहिम यांना इस्माईलच्या गळ्याला कापण्यासाठी जेव्हा सूरी उचलली, तेव्हा अल्लाहच्या आदेशाने इस्माईल अलैहिस्सलामच्या जागी दुम्बा (प्राणी) सादर केला गेला.

इब्राहिम अलैहिस्सलामने जेव्हा आपल्या डोळ्यांवरील पट्टी काढली, तेव्हा त्यांना आपला मुलगा समोर उभा असल्याचे दिसले. अल्लाहला हजरत इब्राहिमची ही कल्पना इतकी आवडली की, त्यांनी आपल्या परिस्थितीनुसार (ज्याची आर्थिक स्थिती बकरी किंवा इतर प्राणी विकत घेऊन ते अर्पण करण्याची असेल) त्याग करणे योग्य केले.