COVID-19 : देशात ‘कोरोना’चा हाहाकार ! आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ‘ब्रेक’, 24 तासात 24805 नवे पॉझिटिव्ह, 613 जणांचा बळी

नवी दिल्ली : देशात वेगाने वाढत असलेल्या कोरोना प्रकरणांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. देशात प्रथमच एका दिवसात कोरोनाच्या जवळपास 25 हजार नव्या केस समोर आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात कोरोनाची 24,805 नवी प्रकरणे समोर आली आहेत, तर 613 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात समोर आलेल्या नव्या प्रकरणांनंतर देशातील कोरोना रूग्णांची संख्या आता 6 लाख 73 हजार 165 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 19,268 रूग्णांचा जीव गेला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, देशात कोरोनाच्या सध्या 2,44,814 अ‍ॅक्टिव केस आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 19,268 रूग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 4,09,082 लोक बरे झाले आहेत. एक परदेशी नागरिक त्याच्या देशात परतला आहे.

कोरोना व्हायरसमुळे सर्वात जास्त महाराष्ट्र प्रभावित असून येथे मागील 24 तासात 7074 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर दिल्लीत एका दिवसात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 2505 झाली आहे. तमिळनाडुत 4280, उत्तर प्रदेशात 757, पश्चिम बंगालमध्ये 743, राजस्थानमध्ये 480 आणि पंजाबमध्ये 172 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संसर्गातून बरे होणार्‍या रूग्णांचा आकडासुद्धा वेगाने वाढत आहे. देशात कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट 60.77 % झाला आहे.

गुजरातमध्ये मोडला रेकॉर्ड, एका दिवसात कोरोनाच्या 712 केस

गुजरातमध्ये कोरोना संसर्गाचा कहर थांबताना दिसत नाही. राज्यात कोविड-19 ची एका दिवसात सर्वाधिक 712 नवी प्रकरणे समोर आली. ज्यानंतर राज्यात एकुण प्रकरणे वाढून 35,398 झाली आहेत. ही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. विभागाने सांगितले की, व्हायरसमुळे आणखी 21 रूग्णांचा मृत्यू झाल्याने आता एकुण मृतांची संख्या वाढून 1,927 झाली आहे. राज्यात प्रथमच एका दिवसात कोरोनाची 700पेक्षा जास्त नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

महाराष्ट्रात रेकॉर्ड, 7 हजारपेक्षा जास्त केस, एकुण आकडा 2 लाखांच्या पुढे

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना व्हायरस संसर्गामुळे स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. रोज संसर्गाच्या प्रकरणांमध्ये नवा रेकॉर्ड होत आहे. मागील 24 तासात कोविड-19 च्या 7074 नव्या केस समोर आल्या. तर या दरम्यान 295 लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात प्रथमच एका दिवसात 7 हजारपेक्षा जास्त केस समोर आल्या आहेत. यासोबतच राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून 2,00,064 झाली आहे. या महामारीमुळे राज्यात आतापर्यंत 8671 लोकांचा मृत्यू झाला आहे.