Coronavirus : परदेश वारी न करता झाला ‘कोरोना’, नाशिकमध्ये पहिला रुग्ण आढळला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असून आज पुण्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच आता नाशिकमध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक पावले उचलली जात आहे. राज्यात संचारबंदी लागू केली आहे तर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आतापर्यंत परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची चाचणी घेत आहे. परंतु, या चाचणी जवळपास बरेच जण निगेटिव्ह आढळले होते. परंतु 9 संशयितापैकी 8 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत तर एका रुग्णाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने कोणताही परदेश दौरा केला नव्हता. असे असतानाही त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित हा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी आहे. लासलगावच्या निफाड तालुक्यातील 30 वर्षीय तरुण आहे. या तरुणाने कोणताही प्रवास केल्याची माहिती नाही. तरी देखील त्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर विशेष कोरोना कक्षात उपचार सुरु असून या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील 6 जणांना स्क्रिनिंगसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. तसेच हा रुग्ण कोणाच्या संपर्कात आला होता याची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

नाशिकमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासकीय आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच जिल्ह्यात कलम 144 सक्त अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. दरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 1024 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत देशभरात 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 8 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत.