Lockdown : अंजिर बागातयदारांवर कोरोनाचे संकट

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   वडकी आणि सासवड परिसर हा विविध फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी अंजिर पिकासाठी वातावरण पोषक होते, पिकही चांगले आले आहे. मात्र, कोरोनाचे संकट कोसळल्याने बाजारपेठच बंद झाली. परदेशात होणारी निर्यात थांबली, पुणे-मुंबई शहरातील विक्री थांबली, त्यामुळे अंजिर उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.

सासवड आणि वडकी परिसरातील फळे पुणे-मुंबईसह परदेशातही निर्यात होतात. मात्र, मागिल महिन्याभरापासून कोरोनामुळे देशभर नव्हे जगभर लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा परिणाम फळविक्रेत्यांवरही झाला आहे. व्यापारी थेट शेतावर येऊन 600 ते 800 रुपये आठ किलोला भावाने घेतात. मात्र, आता तीस-चाळीस रुपयेसुद्धा भाव मिळत नाही. अंजिराची पाटीसुद्धा 30-40 रुपयांना विकून जातो. फळे परदेशात निर्यात होत नाहीत आणि पुणे-मुंबई शहरातही विक्रीसाठी अनेक बंधने आल्याने फळ बागाईतदारांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

आत्माराम काळे (वय 55, रा. सोनोरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अंध आहेत. ते म्हणाले की, मला अर्धा एकर शेती असून, त्यामध्ये अंजिराचे पिक घेतो. माझी पत्नी आणि सून शेतीमध्ये काम करतात. मला दोन मुले आहेत, दोघेही सासवडमधील दुकानामध्ये काम करतात. देशभर लॉकडाऊन असल्यामुळे मुलांचा रोजगारही बंद झाला आहे. अंजिराला भाव मिळत नाही, त्यामुळे आम्ही जीवन कसे जगायचे असा प्रश्न पडला आहे, अशी व्यथा अनेक शेतकऱ्यांनी मांडली.

पुरंदर तालुक्यातील सासवड-वडकी परिसर विविध फळ बागासाठी प्रसिद्ध आहे. सध्या अंजिर पिकांचा हगाम सुरु झाला आहे. मात्र, त्यावर कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे सावट आल्यामुळे फळबागायतदारांची मोठी अडचण झाली आहे. अंजिराला मागणी नाही, बाजार नसल्यामुळे रस्त्यात किंवा शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे. लाखो रूपयाचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

सासवड परिसरात पूर्वी ५ ते ६ हजार एकर क्षेत्रावर अजिंराच्या बागा होत्या. मात्र, आता फक्त ३ ते ४ हजार एकर बागा शिल्लक आहेत. हा माल पुणे मुंबई तसेच दुबई व देशात जात होता चांगले पैसे मिळत होते. शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज फेडून त्यांना शेतीची डागडुजी, घरातील लग्न समारंभ थाटामाटात करता येत होते. अंजिर खरेदी करण्यासाठी पूर्वी व्यापारी शेतावर यायचे आणि शेतातून माल घेवून जायचे. मात्र, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन केल्यामुळे व्यापारी

खरेदीसाठी फिरकत नाहीत. त्यामुळे विक्रीला आलेला माल पडून आहे. फळे हा नाशवंत माल असल्याने तयार झाल्यानंतर काही दिवसात फेकून द्यावा लागत आहे. लॉकडाऊनच्या अगोदर आठ किलोला ७००ते८०० रूपये मिळायचे, मात्र आता 150 रुपयेसुद्धा मिळत नाहीत. काही शेतकरी सासवडच्या बाजारात ४० ते ५० रूपये किलोने विकतात. तोडणी करण्यासाठी मजूरही मिळत नसल्याने अनेकांनी झाडांनाच अंजिर राहू देणे पसंत केले आहे. अंजिर बागायतदारांना एकरी किमान दोन ते तीन लाखरुपये खर्च येतो. मात्र, कोरोनामुळे माल तयार असूनही विक्री होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे अंजिर उत्पादकांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचा पंचनामा करून शासनाने भरपाई द्यावी. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी सहकार्य करावे, अशी भावना फळउत्पादकांनी केली आहे.