Coronavirus : रशियानंतर ‘या’ देशानं घेतली ‘आघाडी’, आपत्कालीन स्थितीत 2 लशींना मंजुरी

बीजिंग : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत २ कोटी २३ लाख ८६ हजार २३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ८ लाख १२ हजार ५२७ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. अशातच चीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. काही निवडक कंपन्यांनी मिळून तयार केलेल्या दोन लशींना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वापर करण्यास चीनने मंजुरी दिलेली आहे. आपत्कालीन स्थितीत ही लस वापरण्यास परवानगी एका आरोग्य अधिकाऱ्याने दिली आहे.

चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय नियम पाळून ही लस दिली जाणार आहे. तसेच लस दिल्यावर रुग्णांचे निरीक्षण नोंदवण्यात येणार असून, डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येईल. या लशीचे होणारे दुष्परिणाम आणि नुकसान याबाबत विचार करुन एक विशेष पॅकेज तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत ही लस दिल्यानंतर योग्य पद्धतीने लशीकरण केलेल्यांना इतर सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती कोरोना संसर्ग लशीकरण विकास टास्क फोर्सचे प्रमुख झेंग झोंगवेई यांनी शनिवारी दिली. तसेच ही लस दिल्यानंतर सुद्धा कोरोना विषाणूचा धोका अनिश्चित काळासाठी असू शकतो, असे त्यांनी सांगितले.

चीनमधील दोन्ही लशींना वैद्यकीय चाचणीची परवानगी मिळाली नसताना देखील केवळ आपत्कालीन स्थितीत वापरण्यास परवानगी दिली आहे. चीनमध्ये एका लशीची सध्या मानवी चाचणी सुरु आहे. ही चाचणी यशस्वीरीत्या सुरु असल्याचा दावा चीनने केला आहे. २२ जुलैपासून ही चाचणी सुरु असून, अद्याप एकानेही ताप आल्याचा दावा केला नाही.

दरम्यान, कोरोना विरुद्धच्या लशीमध्ये रशियाने पहिला नंबर पटकावला असला तरी त्यांची लस अजून बाजारात उपलब्ध झाली नाही. तसेच रशियाने दुसरी लस तयार करण्याचेही काम सुरु केले आहे. भारतात देखील लस तयार झाल्या असून, पहिल्या तीन कंपन्यांच्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. तर दोन अन्य कंपन्यांची चाचणी सुरु आहे.