28 दिवसात 50 लाख रुपये झालं क्वारंटाइन सेंटरमधील 84 डॉक्टरांच्या जेवणाचं बिल, प्रशासनाकडून देण्यास नकार

अलीगढ : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे समाजातील प्रत्येक वर्ग खुप त्रस्त आहे. तर देशात लॉकडाऊनमुळे हॉटेल चालक सुद्धा अडचणीतून जात आहे. परंतु, आता उत्तर प्रदेशच्या अलीगढ क्वारंटाईन सेंटरमध्ये 28 दिवसात 84 डॉक्टरांच्या जेवणाचे बिल 50 लाख रुपये झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बिल पाहून अपर मुख्य सचिव चिकित्सा डॉ. रजनीश दुबे सुद्धा हैराण झाले. मात्र, त्यांनी हे बिल शासन भरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, विज बिलासह हॉटेल स्टाफला रेग्युलर सॅलरी देत आहोत. जिल्हा प्रशासनाद्वारे शहरातील चार हॉटेल उघडण्यात आली होती, जेथे कोरोना योद्धा म्हटल्या जाणार्‍या डॉक्टरांना क्वारंटाइन केले होते. शहरातील या चारही हॉटेलांमध्ये 28 दिवस 84 डॉक्टर्सना ठेवण्यात आले होते. मार्चपासून आतापर्यंत कोणत्याही हॉटेल व्यवस्थापनाचे बिल जिल्हा प्रशासनाने दिलेले नाही.

तर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मानव महाजन यांनी सांगितले की, 50 लाख रुपयांचे बिल बाकी आहे आणि मार्चपासून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने एक पैसाही दिलेला नाही. विज बिल भरायचे आहे आणि स्टाफला सॅलरी द्यायची आहे. जर लवकरात लवकर ही रक्कम मिळाली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू आणि गरज भासल्यास भेटसुद्धा घेऊ.