Coronavirus : वस्तू, पदार्थांची ‘होम डिलिव्हरी’ घेताना ‘ही’ काळजी आवश्य घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – देशासह विविध राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच बसावे लागत आहे. दरम्यान, विविध कारणास्तव अनेकांकडून खाद्यपदार्थ, विविध वस्तूंची होम डिलिव्हरी घेतली जाते. अशावेळी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. नाहीतर कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असते.

कोरोना व्हायरसची बाधा होऊ नये म्हणून अनेक जण घराबाहेर पडत नाहीत. जे काही हवे ते घरच्या घरीच मागवले जात आहे. आवश्यक किराणा साहित्य किंवा खाण्याचे पदार्थाची होम डिलीव्हरी घेतली जाते. त्यावेळी होम डिलीव्हरी घेतानाही योग्य काळजी घेतली नाही तर कोरोना व्हायरसचा धोका आहे. कोरोना व्हायरस वेगवेगळ्या पृष्ठभागावर काही वेळ जिवंत राहू शकतो. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन आणि द लँसेट मायक्रोबने केलेल्या अभ्यासानुसार पेपर आणि टिश्यूवर कोरोनाचा व्हायरस 3 तास जिंवत राहू शकतो. तर कार्डबोर्डवर एक दिवस व्हायरस जिंवत राहू शकतो.

पार्सलसाठी सहसा याच वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. होम डिलीव्हरी घेताना डिलीव्हरी देणा-या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका. पार्सल एका सुरक्षित जागेवर ठेवायला सांगा. पार्सल घेण्यापूर्वी ग्लोव्ह्ज घाला. एखाद्या ठिकाणावर पार्सल ठेवण्यापूर्वी आणि त्यानंतरही ती जागा स्वच्छ करुन घ्या.पार्सल आणि त्याच्या आतील सामान नीट काळजीपुर्वक ठेवा.

खाण्याचे पदार्थ किंवा जेवण असेल तर त्याच पाकिटात खाऊ नका. एका स्वच्छ भांड्यात काढून घ्या आणि गरम करून घ्या. पाकीट फेकून द्या. त्यानंतर हात साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद धुवा. चेह-याला हात लावू नका. असे केल्यास कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होते.