पुण्यात सर्वप्रथम ‘या’ कर्मचार्‍यांना मिळणार ‘कोरोना’ची लस, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रसार सुरु असतानाच त्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी लसीचे काम सुरु आहे. २०२१ च्या सुरुवातीस ही लस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने लस तयार झाल्यावरती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी सुरु केली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील सुमारे १ लाख १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात प्रथम लसीचा डोस देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितलं की, लसीची मागणी साधनसामग्री व लस देण्या संदर्भातल्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शक सूचना ठरवण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून सीव्हीबीएमएस ही प्रणाली तयार करण्याचे काम सुरु आहे. त्याच्यामध्ये पहिल्या फेरीत आरोग्य संस्था, आरोग्य व्यवस्थेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांची माहिती गोळा केली जात आहे. त्यात खाजगी व सरकारी संस्था यांचा समावेश आहे. या सर्वांना लस उपलब्ध झाल्यावर लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार असून, त्यानंतर पुढील लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येईल.

दरम्यान, मागील आठ नऊ महिन्यांपासून सरकारी व खाजगी पातळीवर कोरोनाचे काम सुरु आहे. आरोग्य यंत्रणेद्वारे दररोज सर्वेक्षण, संपर्कातील व्यक्ती शोधणे, सामान्य आजार ते गंभीर आजारी रुग्णांचे अति दक्षता विभागातील व्यवस्थापनाचे काम न अडथळता सुरु आहे. या प्रक्रियेत आरोग्य विभागातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली तर काहींना आपला जीव गमवावा लागला. तरी सुद्धा माघार न घेता आरोग्य विभागातील आपले कोरोना योद्धे हे काम करत होते व यापुढेही करत राहतील. राज्य सरकारने या फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना लस देण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळणार आहे, असे डॉ. देशमुख म्हणाले.

या लोकांना सर्वात प्रथम कोरोना लस
अग्रभागी कार्यरत कर्मचारी, आरोग्य सेविका व सेवक, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक, नर्स सर्वे कर्मचारी, सुपरव्हायजर, वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल स्टाफ, शास्त्रज्ञ आणि संशोधक, मेडिकलचे विद्यार्थी.