भारतीय WhatsApp बनविण्यासाठी काम सुरु, मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली माहिती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना साथीच्या काळात आयोजित ई-अजेंडा कार्यक्रमात आज दिवसभरात मोदी सरकारचे 17 मंत्री सहभागी होतील. आगामी आव्हानांवर आणि सरकारच्या कृती योजनेवर ते भाष्य करतील. यात मोदी सरकारचे कायदा, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही सहभाग दर्शविला. चर्चेदरम्यान महत्त्वपूर्ण माहिती देताना ते म्हणाले की, सरकार भारतीय व्हॉट्सअ‍ॅप बनवण्यावरही काम करत आहे. भारतातील नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर ( NIC) आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटीक ( CDOT) हे भारतीय व्हॉट्सअ‍ॅप बनविण्यावर भर देत आहेत.

त्याचप्रमाणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप झूमच्या प्रश्नावर बोलताना मंत्री म्हणाले कि, आम्ही भारतातही या पर्यायाचा शोध घेत आहोत. त्याचबरोबर सरकार लोकांना भारतीय आयटी उत्पादने बनवण्यासाठीही प्रोत्साहन देत आहे. यासाठी 3,000 मोठ्या आणि छोट्या कंपन्यांचे अर्जही आले आहेत. तसेच, घरातून काम करण्याबाबत चर्चेदरम्यान रविशंकर प्रसाद म्हणाले की, आम्ही ‘वर्क फ्रॉम होम’ ही सुविधा मजबूत केली आहे आणि ती कायम करण्यासाठी कामही सुरू आहे.

या सर्वा व्यतिरिक्त सरकारच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप आरोग्य सेतुबद्दलही चर्चा झाली. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी आरोग्य सेतूवर उपस्थित होणार्‍या प्रश्नांची उत्तरे दिली. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या अ‍ॅपच्या खाजगीकरणाचा धोका असल्याच्या दाव्याबाबत मंत्र्यांनी स्पष्टपणे नकार दिला. ‘हे अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित आहे, या अ‍ॅपचा संपूर्ण डेटा एन्क्रिप्टेड आहे. येथे सामान्य डेटा 30 ते 60 दिवसात स्वयंचलितपणे काढला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ते म्हणाले कि, जर एखाद्या टेक एक्सपर्टला असे वाटते की, यात काही सुधारणा करता येतील तर नक्की कळवा. त्याचप्रमाणे आरोग्य सेतुमध्ये ब्लूटूथ का सुरू केला जात आहे असे विचारले असता ते म्हणाले कि, ‘तंत्रज्ञानाद्वारे ट्रेसिंगच्या दृष्टीने अ‍ॅपमध्ये ब्लूटूथचा वापर केला गेला आहे’.