Coronavirus : गावात आल्याने ‘यादीत’ नाव टाकले, रागाने जवानाचा ग्रामसेवकावर ‘गोळीबार’

 उत्तर प्रदेश :  वृत्तसंस्था –   देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकजण आपल्या गावी परतत आहेत. मैनपुरी येथील कुर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अलीपूर या गावातील ग्रामसेवकाने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुचनेवरून कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी इतर ठिकाणाहून आलेल्या लोकांची यादी तयार केली. गावात आलेल्या सैनिकांची आणि त्यांच्या कुटुंबाची नावे यादीत नोंदवण्यात आली. याचा राग आल्याने बुधवारी सकाळी साथीदारांच्या मदतीने ग्रामसेवकाच्या घरात घुसून त्याला मारहाण करत गोळीबार केला. यामध्ये ग्रामसेवकाच्या वहिनीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सैनिकाला अटक केली आहे.

गाव अलीपूर येथील रहिवाशी असलेल्या ग्रामसेवक विनय यादव यांना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूपासून बचावासाठी गावात येणाऱ्या लोकांची यादी तयार करण्यास सांगितले होते. मंगळवारी संध्याकाळी विनय गावातील शहरातून आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांची यादी तयार करत होता. या यादीमध्ये कोलकाताहून आलेल्या सैनिकांची आणि त्यांच्या कुटुंबाची नावे नोंदवण्यात आली. शिपाई शैलेंद्र कुमार, मुलगा कमलेश कुमार, त्याचा भाऊ विजेंद्र कुमार, जितेंद्र, ज्ञानप्रसाद, गौरव, रजनेश यांची नावे यादीत नोंदवली होती.

शैलेंद्र कुमार याने मंगळवारी सायंकाळी ग्रामसेवक विनय यादव याला यादीतून कुटुंबाची नावे काढून टाक नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु ग्रामसेवक विनय यांने शैलेंद्रच्या धमकीकडे दुर्लक्ष केले. बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास चार आरोपींनी ग्रामसेवक विनय यांच्या घरात घुसून मारहाण केली. तसेच शैलेंद्र याने रायफलमधून गोळीबार केला. ही गोळी घरातील ग्रामसेवकाच्या वहिनी संध्या यादव (वय-30) यांच्या गळ्याला लागली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सैन्यातील शिपाई शैलेंद्र कुमार याला अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी ग्रामसेवक विनय यादव यांनी फिर्याद दिली आहे.