Unlock : दिवाळीपर्यंत संपूर्ण अनलॉक करणे घाईच आणि धाडसाचे ठरेल ! मुंबईत धोका वाढला, IMA चा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉकचे संकेत दिले असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी मात्र असे करण्याबाबत गंभीर इशारा दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची कोणतीही आकडेवारी हातात नसताना दिवाळीपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे पाऊल ठरेल, असे डॉ. भोंडवे यांनी पत्रकारांना सांगितले.

नोव्हेंबरपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक होण्याचे संकेत देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते की, राज्यात कोरोनाबाधितांची रोजची संख्या कमी होत आहे. मृत्युदरातही घट झाली आहे. तसेच रुग्णवाढीचा दर कमी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव येत्या काही दिवसांत आणखी कमी झाला तर दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकतील.

टोपे यांच्या या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त करत डॉ. भोंडवे म्हणाले, कोरोनाबाबत कोणतेही अनुमान काढण्यासारखी सध्याची परिस्थिती नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आकडेवारीतून दिसत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे ठरेल. उलट अधिक काळजी घ्यावी लागेल.

दरम्यान, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत मात्र रोज 2,200 ते 2,800 नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता 2 लाख 27 हजार 276 एवढी झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 9,391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकुण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 25,358 एवढी आहे.