Coronavirus : 2012 मध्येच चीनच्या खाणीत वटवाघुळांमुळं पसरला ‘कोरोना’, आता लॅबमधून ‘लीक’ झाला, संशोधकांचा दावा

बीजिंग : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग त्रस्त झाले. या विषाणूमुळे जगभरात दोन कोटी पेक्षा अधिक लोक संक्रमीत झाले आहेत तर सात लाखाच्यावर लोकांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाच्या फैलावासाठी सुरुवातीपासूनच चीनला जबाबदार धरण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना विषाणू आणि चीनबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोविड-19 या विषाणूचा फैलाव सात वर्षापूर्वी म्हणजेच 2012 मध्ये चीनच्या एका खाणीत झाला होता. या खाणीत वटवाघुळांची विष्ठा साफ करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना निमोनियासारख्या विषाणूमुळे बाधित झाले होते.

यापैकी तिघांचा मृत्यू झाला होता, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान या घटनेचेही वुहानमधील लॅबशी कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांनी मिळवलेल्या माहितीनुसार, चीनमधील युन्नन प्रांतातील मोजियांग येथील खाणीत सहा कामगार अचानक आजारी पडले होते. हे कामगार खाणीतील वटवाघुळांची विष्ठा साफ करत असतं. याच दरम्यान या मजुरांवर उपचार करणारे डॉक्टर लू सू यांच्या निदर्शनास आले की, या रुग्णांना तिव्र ताप, सुका खोकला, हात-पायाचे दुखणे तर काही रुग्णांना डोकेदुखीचा त्रास होता. हा सर्व लक्षणे आता जगात पसरलेल्या कोरोनाची लक्षण आहेत. ही खाण वुहानपासून एक हजार किमी दूर आहे.

वुहान लॅबमधून विषाणू लिक
विषाणूतज्ज्ञ जोनाथन लॅथम आणि मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट अॅलिसन विल्सन बायोसायन्स रिसोर्स प्रोजेक्टवर काम करत आहेत. दरम्यान, त्यांनी ली शू यांचे त्याबाबतचे शोध निबंध वाचले होते. यामध्ये जे पुरावे देण्यात आले आहेत. त्यानंतर ते या साथीला नव्याने समजून घेत आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या मजुरांचे सॅम्पल टिश्शू वुहानमधील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते, आता तिथूनच हा विषाणू लीक झाला आहे, असा दावा त्यांनी केला असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.