‘जनता कर्फ्यू’मुळं ‘मुहूर्ता’च्या 24 तासांपुर्वीच उरकलं ‘लग्न’, ‘मास्क’ बांधून घेतले ‘नवरा-नवरी’नं 7 ‘फेरे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात कहर माजवला आहे. हा व्हायरस दिवसेंदिवस फैलावत चालला आहे. राज्यात लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता ७४ वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर एका जोडप्याने एक दिवस आधीच म्हणजेच काल (शनिवारी) मोजक्याच पाहुण्यांमध्ये आपला विवाह सोहळा उरकून घेतला. महत्वाचे म्हणजे, यावेळी नवरदेव – नवरीने मास्क लावून फेरे घेतले. हा विवाहसोहळा नवरदेवाच्या घरी कल्याण येथे पार पडला. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन या विवाह सोहळ्याला मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रीत करण्यात आलं होतं.

माहितीनुसार, रुपेश जाधव (25) आणि प्रियांका (24) या दोघांचा विवाह हा 22 मार्चला (आज) होणार होता. परंतु जनता कर्फ्यू असल्याने एक दिवस आधीच विवाह सोहळा उरकून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. नवरदेव हा वकील असून नवरी ही एका आयटी कंपनीत नोकरी करते. पांढरा शुभ्र पोशाख आणि चेहऱ्यावर मास्क परिधान करून ह्या जोडप्याने विवाह केला. तसेच हे जोडपे वारंवार सॅनिटायझरने हात धुतानाहि दिसत होतं. विवाहानंतर रुपेशने सांगितलं की, 22 मार्चला होणाऱ्या या विवाहाची संपूर्ण तयारी झाली होती. आम्ही फेब्रुवारीमध्ये हॉल बुक केला होता. पाहुण्यांना देखील पत्रिका पाठवण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळा रद्द करून 20 पाहुण्यांच्या उपस्थित अगदी साध्या पद्धतीने लग्न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातल्या नागरिकांना अधिक सावध राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. रुग्णांचा हा वाढता आकडा पाहता महाराष्ट्र कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

तसेच, कोरोनाची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात कोरोना संसर्ग पसरण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले कि, राज्य सरकारकडून वारंवार खबरदारीचे उपाय घेतले जात असून वारंवार सूचना दिल्या जात आहे. परंतु, तरीही लोकांकडून नियमांचं काटेकोर पालन केलं जात नाहीय. त्यामुळे समूह संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांनी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं नीट पालन केलं पाहिजे.