काय सांगता ! होय, टॅक्सीवाल्यानं विद्यार्थ्यांना बिल सांगितलं 60 हजार, म्हणाला – ‘घरी कसं जायचं तुमचं तुम्ही बघा’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे इराणहून आलेले दोन भारतीय विद्यार्थी जैसलमेर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांना आता घरी परतण्याची स्वतः व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. सध्या संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन आहे. वाहतुकीचे कुठलेही साधन उपलब्ध नाहीय. अशा परिस्थिती घरी जायचे तरी कसे? हा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करुन मायदेशी आणण्यात आले. जम्मू-काश्मीर, लडाखमधील यात्रेकरुंसह हे दोन विद्यार्थी सुद्धा मायदेशी परतले. मीनहज आलम आणि मोहम्मद अशी या दोन भारतीय विद्यार्थ्यांची नावे आहेत. मीनहज पश्चिमबंगालमधील उत्तर दिनाजपूरचा तर मोहम्मद बिहार मुजफ्फरपूरचा राहणारा आहे.

इराणमधून आल्यानंतर या सर्वांना जैसलमेरमधील लष्कराच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. मीनहज आणि मोहम्मद दोघांनी क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. मीनहज आलम इराणची राजधानी तेहरानमधील विद्यापीठात मास्टर्सचे शिक्षण घेत आहे. सेंटरमधील अधिकार्‍यांनी घरी परतण्याची तुमची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल असे मला सांगितले. जैसलमेर ते उत्तर दिनाजपूर हे अंतर तब्बल 2 हजार किलोमीटरचे आहे. एका खासगी टॅक्सी चालकाने या अंतरासाठी 60 हजार रुपयांची मागणी केली असे मीनहज म्हणाला. माझ्याबरोबर आलेले यात्रेकरु आणि काश्मिरी विद्यार्थ्यांची घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली पण मला स्वत:ची व्यवस्था स्वत: करण्यास सांगितले. हा भेदभाव का? असा सवाल मीनहजने केला आहे. मीनहजच्या बरोबरीनो मोहम्मदला सुद्धा हेच सांगण्यात आले आहे.