काय सांगता ! होय, ‘कोरोना’च्या संशयानं पठ्ठ्यानं चक्क पत्नीला बाथरूममध्येच कोंडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या भीतीने जग हादरुन गेले आहे. जगभरातील देशांनी कोरोनाचा धसका घेतला आहे, त्यामुळे लोक प्रचंड खबरदारी घेत आहेत. लोक कोरोनामुळे स्वत:ची किती काळजी घेत आहेत हे पुढील उदाहरणावरुन तुम्ही समजून घेऊ शकतात. युरोपात लिथुआनिया या देशात कोरोना संबंधित एक वेगळाच प्रकार घडला. या देशातील एका पतीने पत्नीला कोरोना असल्याच्या संशयाने थेट बाथरुममध्येच कोंडून ठेवले.

स्थानिक माध्यमांनी याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, एका घरातील बाथरुममध्ये महिलेला बळजबरीने कोंडून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना संपर्क करुन कळवण्यात आली. पोलिसांनी हे ऐकून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कळाले की पतीनेच आपल्या मुलांच्या मदतीने पत्नीला बाथरुममध्ये कोंडून ठेवले होते. पत्नीला कोरोना झाल्याचा संशय पतीला होता. त्यामुळे स्वत:चा आणि मुलांचा बचाव करण्यासाठी त्याने पत्नीला बाथरुममध्ये कोंडून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना दिली.

या महिलेने आपल्या पतीला माहिती दिली की ती एका कोरोना झालेल्या चीन महिलेला भेटली होती. त्यामुळे पत्नीला देखील कोरोनाची बाधा झाली असावी या संशयाने पत्नीला बाथरुमध्ये कोंडून ठेवले. तत्पूर्वी त्याने डॉक्टरांसोबत फोनवर देखील चर्चा केली होती.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या महिलेची सुटका केली. त्यानंतर या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली परंतु तिला कोरोना झाला नसल्याचे सिद्ध झाले. पत्नीच्या विनंतीनंतर पोलिसांनी पतीवर कारवाई केली नाही.

लिथुआनियामध्ये कोरोनाची बाधा झालेला एक 39 वर्षीय रुग्ण आढळला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. लिथुआनियामध्ये इटलीहून अनेक पर्यटक येतात. त्यामुळे लिथुआनिया सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. इटलीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे. तर भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 30 झाली आहे.