आरोग्यमंत्री राजेश टोपे पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्यामुळे सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे परिस्थितीवर लक्ष ठेवून राज्यभरातील माहिती घेत आहे. दरम्यान, टोपे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले आहेत. राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

राज्य सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी बहुतांश शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. कोरोनामुळे मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आदी), पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापने, कारखाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला. बंदमधून दूधविक्री केंद्रे, जीवनावश्यक वस्तुविक्री दुकाने, किराणा दुकाने, बँका, औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत.