महाराष्ट्र आणि कामगार दिनावरही सावट, ‘कोरोना’ व्हायरसच्या संसर्गाचा परिणाम

पुणे : प्रतिनिधी – महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि पहिली ते आठवी आणि अकरावीतील मुलांसाठी गुणपत्रिका आणि गुणगौरव सोहळा असतो. वर्षभर विविध क्षेत्रात कर्तृत्व मिळविलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदकं देऊन, तर राज्य शासनाकडून गुणवंत कामगार असे पुरस्कार देऊन सन्मानसोहळा, पोलिसांची परेड, शाळा-महाविद्यालायतील विद्यार्थ्यांची एनसीसी, स्काऊटची परेड अशा अनेकविध कार्यक्रमांची दिवसभर मेजवाणी असते.

शाळा-महाविद्यालयांमध्ये पहिल्या आलेल्या मुलांचा प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम देत मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सन्मान केला जातो. तसेच, पोलीस दलातील आणि कंपन्यांमधील गुणवंत कामगारांनाही राज्यपालांच्या हस्ते सन्मानित केले जाते. ही परंपरा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून अखंड सुरू आहे. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्व कार्यक्रम रद्द केले गेले आहेत.

महाराष्ट्र दिनाच्या म्हणजे 1 मे रोजी विद्यार्थ्यांना भीती वाटते. वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फलित निकलारूपी हातात येणार असते. त्यामुळे उत्सुकता, भीती, चिंता अशा संमिश्र भावना त्यांच्यात निर्माण झालेल्या असतात. मात्र, यंदाचे वर्ष या परिस्थितीला अपवादच ठरले आहे. परीक्षाच न झाल्याने १ मे हा निकालाचा दिवसदेखील कोणत्याही चिंतेशिवाय जाणार आहे, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

जगभर करोना व्हायरसच्या संसर्गाचे संकट आल्याने यंदा प्रथमच परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे शाळांना मार्च महिन्यातच सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. अन्यथा दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू राहून १ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येतो. सकाळी शाळेत जाण्याची घाई, त्यानंतर वर्गशिक्षकांनी दिलेले निकाल, मित्रमैत्रिणींमध्ये त्याविषयी होणारी चर्चा, कमी गुण मिळाले तर, काहींचा रडवेला चेहरा पाहावयास मिळतो. गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेत शाबासकीची थापही या दिवशी मिळत असते.

 

ध्वजारोहन करू नये
शाळांमध्ये दरवर्षी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भाषणांबरोबर प्रमुख पाहुण्यांची देशभक्तीपर भाषणांनी परिसर दणाणून जातो. मात्र, करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी शाळांनी १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन करू नये, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिल्या आहेत. त्यामुळे हा दिवस साजरा केला जाणार नाही.