कोरोनाचा राज्याला धोका, रुग्णांची संख्या 26 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि उपाययोजना करण्यात येत असले तरी, रुग्णांचा आकडा वाढत आहे. राज्यात एकूण 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पुण्यात सर्वाधिक 10 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईत रुग्णांचा आकडा पाचवर पोहचला आहे.
राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्य़ंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात परीक्षा सुरु राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरु राहतील अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. दरम्यान राज्यात कोरोनाचे 26 रुग्ण आढळून आले आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी कायदा लागू करण्यात आला असून चित्रपटगृह, नाट्यगृह, जलतरण तलाव, जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ससंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना निर्गमित केल्या आहेत. शहरी भागातील शाळा, महाविद्यालये 31 मार्च पर्य़ंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.