Coronavirus : ‘कोरोना’चं चीनवरच होणार ‘बुमरँग’, भारत जगासाठी ठरणार ‘बाजीगर’ !

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनामुळे चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंचा पुरवठा थांबला आहे. संपूर्ण बाजारसाखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे येत्या पुढील काळात देश आणि कंपन्यांदेखील आपले एका देशावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी सक्षम पर्याय शोधतील. याचा फायदा घेत भारत हा युरोप, अमेरिकेला विविध वस्तूंचा पुरवठा करणारा देश म्हणून पुढे येईल. त्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मांडले.
कोरोनामुळे जगभरात पुरवठासाखळी खंडीत झाली आहे. अमेरिका, युरोप आणि भारतासह इतर देशांनी चीनमध्ये गुंतवणूक केली आहे. स्टील, इलेक्ट्रॉनिक, मोटार, रिटेल, रसायन, औषध आणि औषधांचा कच्चा माल, घरगुती वापराच्या वस्तू, लेदर या उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे. भारतात रसायन, चामडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात होते. मात्र, कोरोनामुळे ही आयात आता ठप्प झाली आहे. त्यामुळे एका लेदर कंपनीने मुंबईतील एका लघु-मध्यम कंपनीला प्राधान्यक्रमाचा विक्रेत्याची पसंती देत अवघ्या 20 दिवसांत नोंदणी केली आहे.

कोरोनामुळे चीनची झालेली अढी भारताच्या फायद्याची ठरणार आहे. चीनमधून ज्या वस्तू व सेवांचा पुरवठा युरोप व अमेरिकन उपखंडात होतो त्यातील कोणत्या वस्तू आपण करू शकतो हे पाहून सरकारने धोरण आखले पाहिजे. कोरोनामुळे भारतात देखील यावर्षी मंदी राहील. पुढील आर्थिक वर्षापासून यामध्ये सुधारणा होईल, अशी आशा कांबळे यांनी व्यक्त केली.