Coronavirus : राज्य पोलिस दलातील 23 जणांना ‘कोरोना’मुळं ‘मनस्ताप’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा पोलीस दलातही संसर्ग वाढू लागला आहे. बाधित अधिकारी, अंमलदारांसोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या सहकार्‍यांना संशयित म्हणून अलगीकरणाच्या (क्वारंटाईन) सूचना दिल्या जात आहेत. या परिस्थितीमुळे पोलीस दलावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

राज्य पोलीस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे 23 अधिकार्‍यांसह अमंलदारांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये मुंबईतील अधिकारी, अंमलदारांची संख्या जास्त आहे. राज्य रेल्वे दलात नेमणुकीस असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे शिपाई करोनाचे पोलीस दलातील पहिले लक्ष्य ठरले होते. त्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेणार्‍या या पोलीस शिपायाच्या संपर्कात आलेल्या 25 सहकार्‍यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी काहींना दोन आठवडयांसाठी घरीच राहाण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर वरळीच्या पोलीस वसाहतीत वास्तव्य असलेल्या पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. ठाणे, भायखळा, नायगाव, रफी अहमद किडवई मार्ग पोलीस वसाहतीत राहणार्‍या पोलीस अधिकारी, अंमलदार बाधीत झाले आहेत.

महापालिकेने बाधित पोलिसांचा वावर, जनसंपर्क लक्षात घेऊन पोलीस वसाहतींमधील इमारतीच्या इमारती प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. तसेच मास्क आणि सॅनीटायझरचा पुरवठा प्रत्येक पोलीस ठाण्याला केला जात आहे. याशिवाय बंदोबस्तावर असलेल्या मनुष्यबळाला दिवसातून किमान दोन वेळा र्निजंतुक केले जाईल यासाठी पाच विशेष वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. शहरातील सुमारे 40 पोलीस ठाण्यांच्या प्रवेशद्वारावर औषध फवारणीची सुविधा बसविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली.