Corona Virus : शेवटी तेच झालं ज्याची ‘भीती’ होती, आता ‘या’ पद्धतीनं फोफावतोय मृत्यूचा ‘व्हायरस’

बिजिंग : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने मरणार्‍यांची संख्या आता 910 झाली आहे. यापैकी चीनमध्ये 908 आणि फिलिपिन्स व हाँगकाँगमध्ये एक-एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये संसर्गाने 40,000 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत हा व्हायरस संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने दुसर्‍या व्यक्तीला होत होता, परंतु आता जे वृत्त समोर आले आहे त्यामुळे जगाची झोप उडाली आहे. शांघायच्या अधिकार्‍यांनी खुलासा केला की, कोरोना व्हायरस आता हवेतील दमटपणात मिसळून पसरण्यास सुरूवात झाली आहे आणि हवेतून दुसर्‍या व्यक्तीमध्ये संसर्ग होत आहे. ज्यास एरोसोल ट्रान्समिशन म्हटले जाते. सेवेर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स), खसरा, आणि एच5 एन1 एव्हियन इन्फ्लूएंजासुद्धा एरोसोलच्या माध्यमातून पसरण्यास सक्षम झाला आहे. जो काही काळासाठी हवेत राहू शकतो.

आतापर्यंत हा व्हायरस दोन पद्धतीने पसरत होता. पहिली पद्धत, पीडित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने. यामध्ये संक्रमित व्यक्तिद्वारे खोकणे आणि शिंकणे याचा संबंध आहे. दुसरी पद्धत म्हणजे जर पीडित व्यक्ती आपल्या तोंडाला, नाकाला आणि डोळ्यांना स्पर्श करून नंतर कोणत्याही वस्तूला स्पर्श करत असेल. जागतिक आरोग्य संघटनेचे एक तज्ज्ञ, जियांग रोंगमेंग यांनी सांगितले की, पर्यावरणाच्या आधारे आणि सध्याचे आकडे यावरून समजते की कोरोना व्हायरस पृष्ठभागावर अनेक तास किंवा पाच दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.

शांघाय सिव्हिल अफेयर्स ब्यूरोचे डेप्युटी हेड यांनी सांगितले की, एरोसोल ट्रान्समिशनचा अर्थ आहे की, हवेतील सूक्ष्म बाष्पकणांमध्ये मिसळून हा व्हायरस एरोसोल बनत आहे. आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, अशा हवेत श्वास घेतल्याने संसर्ग होत आहे. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोकांनी जरूरी उपाय आणि जागृत राहण्याची गरज आहे. कोरोना व्हायरस विषाणूंचा एक मोठा समूह आहे. परंतु यामध्ये केवळ सहाच विषाणू लोकांना संसर्ग करतात. याच्या संसर्गाची सर्दी, ताप ही सामान्य लक्षणे आहेत. परंतु सिवीयर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) असा कोरोना व्हायरस आहे ज्याच्या प्रकोपाने 2002-03 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये सुमारे 650 लोकांचा मृत्यू झाला होता.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस चीनच्या बाहेर पसरत असल्याने इतर देशांना आवाहन केले आहे की, या घातक विषाणूपासून वाचण्यासाठी तयार रहा. डब्ल्यूएचओ प्रमुख तेदरोस अदहानोम गेब्रेयसस यांनी म्हटले की, जे लोक चीनला गेले नव्हते अशा लोकांमध्ये सुद्धा या विषाणूचा संसर्ग दिसून आला आहे. गेब्रेयसस यांनी ट्विट केले आहे की, जे लोक चीनला गेले नव्हते त्यांनाही लागण झाल्याने अन्य देशांनी याच्या व्यापक प्रसाराची दखल घेऊन सावध झाले पाहिजे. थोडक्यात ही केवळ सुरूवात आहे. अन्य देशांनी यास प्रतिबंध करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. याचा प्रसार होताच तो नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत.