Coronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली ‘ही’ अभिनेत्री, मुंबईच्या हॉस्पीटलमध्ये करतेय ‘सेवा’

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. व्हायरसच्या संसर्ग थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाउन केले आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वजण आपापल्या परिने सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कलाकार देखील मागे नाहीत. या सर्वामध्ये नुकताच एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्री शिखा मल्होत्राचा फोटो शेअर करीत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सेवा करताना दिसत आहे.

बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेत्री शिखा मल्होत्राचा फोटो शेअर केला आहे. शिखाने संजय मिश्रा यांच्यासोबत ‘कांचली’ या चित्रपटात काम केले आहे. ‘शुक्रवारी शिखाने जोगेश्वरीमधील बीएमसीच्या ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. शिखाने वर्धमान महावीर मेडीकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये 2014 मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे. अभिनयाची आवड असल्यामुळे तिने आजवर नर्सचे काम न करता केवळ अभिनय क्षेत्रात काम केले होते’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

बीएमसीने शिखाला नर्स म्हणून काम करण्यास परवानगी दिली आहे. सध्या ती जोगेश्वरीमधील हिंदूहृदय सम्राट ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्यूटी करत आहे. विरलच्या पोस्टमध्ये शिखाने तिचे मत मांडले आहे. ‘नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर आम्ही समाज कल्याणाची शपथ घेतली होती आणि माझ्या मते हिच ती योग्य वेळ आहे’ असे तिने म्हटले आहे.