Corona Lockdown : कौतुकास्पद ! स्वतःच्या मालकीची जमीन त्यांनी विकली 25 लाखास, दोघांनी केली तब्बल 14 हजार शेतकर्‍यांना मदत

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्यामुळे अनेक गोरगरिबांचे हाल सुरु आहेत. अशातच कर्नाटकमधील कोलार येथील दोन भावांनी स्वत:च्या मालकीचा जमीनीचा तुकडा 25 लाखांना विकली. त्यानंतर लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या हातावर पोट असणार्‍या 14 हजार कामगारांना मदत करण्यासाठी तजामुल आणि मुझमील पाशा या दोन भावांनी आपल्या मालकीचा जमीनीचा तुकडा विकला आहे.

कोलारमधील हाऊसिंग बोर्ड कॉलिनीमध्ये राहणार्‍या या दोन्ही भावांनी मिळालेल्या पैश्यामध्ये गरिबांसाठी किराणा माल आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची खरेदी करुन वाटप केले. कोरोनाविरुद्ध लढायचे असेल तर आयसोलेशन महत्वाचे आहे. गरिबांना जेवायला अन्न मिळाले नाही तर ते रस्त्यावर भटकत राहणार. त्यामुळेच त्यांनी घरामध्येच रहावे त्यांना किराणा माल आणि अन्न त्यांच्या घरी पोहचवणे हा एकच पर्याय आहे, असे तजामुल पाशा याने सांगितले. चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यामध्ये असणार्‍या मोहम्मदपूर गावाचे मूळ रहिवाशी असणार्‍या या दोघा भावंडांवरील पालकांचे छत्र लहानपणीच हरवले. तजामुल आठ वर्षांचा असताना आणि मुझमील पाच वर्षांचा असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. त्यानंतर एका मुस्लीम व्यक्तीने आम्हाला मशीदीजवळ रहायला घर दिले. त्या काळात तेथील हिंदू, मुस्लीम आणि शीख कुटुंबांनी अन्न देऊन आमची भूक भागवली. तेथील लोकांमध्ये धर्म आणि जात कधीच आडवी आली नाही. मानवता आणि प्रेम मिळाल्यानेच आम्ही खडतर परिस्थीतीमधून इथपर्यंतचा प्रवास करु शकतो आणि आज आम्ही परतफेड करत आहोत. अशा परिस्थितीमधून आल्याने अन्नाची किंमत काय असते हे आम्हाला ठाऊक आहे. लहानपणी आलेल्या या अनुभवामुळेच आम्ही लॉकडाउनसंपेपर्यंत गरिबांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे तजामुल याने सांगितले आहे. आतापर्यंत पाशा बंधूंनी 2 हजार 800 कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले आहे. याचा फायदा 14 हजार लोकांना झाला आहे. तर कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दोन हजार लोकांचे पोट त्यांनी भरले आहे. आता पाशा बंधूंनी त्यांच्यासारखे काम करण्याची इच्छा असणार्‍यांना सोबत घेऊन हे काम सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे.