Coronavirus Lockdown : पुण्यात दशक्रिया व इतर विधी करण्यास 31 मार्चपर्यंत असमर्थता, व्हिडियो कॉल वर विधी करण्याचा पर्याय उपलब्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने देशात लॉकडाऊन केले आहे. कोरोना व्हायरच्या दहशतीमुळे अनेकांनी आपल्या घरातील शुभकार्य पुढे ढकलले आहेत. तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने लग्न किंवा विधी करण्यात येत आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योग धंद्यांना याचा फटका बसला आहे. आता याचा फटका अंत्यविधीला देखील बसला आहे. पुण्यातील भटजींनी दशक्रिया व इतर विधी परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे वैकुंठात अंत्यविधी करणाऱ्या सर्व गुरुजींनी चर्चा करून सद्य परिस्थितीत त्यांनी दशक्रिया विधी करण्यास 31 मार्चपर्यंत असमर्थता व्यक्त केली आहे.

मात्र प्रशांत मोघे गुरुजी यांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अंत्यविधी करण्यास संमती दर्शविली असून ते विधी करणार आहेत. मात्र ते रात्री ९ ते सकाळी ९ ह्या वेळेत उपलब्ध नसणार आहेत. या कालावधीत अंत्यसंस्कार करु इच्छिणाऱ्यांनी भडाग्नी द्यावा व अस्थी पूजन करण्याचा पर्याय ही प्रशांत गुरुजीनी दिला आहे. तसेच ज्यांना दशक्रिया व तत्सम विधी करावयाचा आहे त्यांच्यासाठी प्रशांत मोघे गुरुजींनी व्हिडियो कॉल वर विधी करण्याचा पर्याय ही उपलब्ध करुन दिला आहे.

गुरुजींना पालिकेकडून पास
हिंदू धर्मामधील अंत्यविधी व तत्पश्चात केले जाणारे विधी यांचे महत्त्व बघता महापालिका प्रशासनाने हे कार्य करणाऱ्या गुरुजींना लॉकडॉउन काळात विधी करण्यासाठी वैकुंठ किंवा अन्यत्र जाण्यासाठी पासची व्यवस्था केली आहे.

श्राद्धविधीसाठी ऑनलाईनचा पर्याय
नागरिकांनी संयम बाळगावा व परिस्थिती निवळल्यावर विधी करावेत हेच श्रेयस्कर होईल. प्रशासनाने तसे आवाहन करणारे फलक सर्व स्मशानभूमीत लावावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी ज्ञानप्रबोधिनीने श्राद्धविधीसाठी ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मात्र दाहकर्मासाठी ज्ञान प्रबोधिनीच्या www.santrika.org या वेबसाईट वर जाऊन सुलभ पद्धतीने कुटुंबातील व्यक्तीनेच वाचन व क्रिया करुन अंत्यविधी पार पाडण्याचा पर्याय ही देण्यात आला आहे. तरी नागरिकांनी या पर्यायाचा वापर करावा असे आवाहन क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले आहे.