‘कोरोना’चा मेंदूवर काय परिणाम होतो ? नवीन अभ्यासात झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकरित्या देखील लोकांवर परिणाम करत आहे. सद्य परिस्थितीमुळे थोडासा तणाव असणे स्वाभाविक आहे, पण जेव्हा तो जास्त होतो, तेव्हा त्याचा आपल्या सामान्य दिनक्रमावर परिणाम होण्यास सुरवात होते. नवीन अभ्यासात हेच सांगितले गेले आहे की, मानसिक ताणतणाव लोकांमध्ये हळूहळू कसा गंभीर होत आहे आणि मानसिकरित्या त्याचा कसा सामना करू शकतो. अमेरिकन सायकॉलॉजिस्ट जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासात आधीपासूनच एखादा आजार असलेले लोक, ७० वर्षाजवळील लोक, कमकुवत रोग प्रतिकारक शक्ती असणारे आणि गर्भवती महिलांचाही समावेश होता. अभ्यासातील लेखकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ८४२ लोकांना काही प्रश्न विचारले. हे प्रश्न कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनशी संबंधित होते.

प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांपैकी ८० टक्के महिला होत्या, ज्यांचे सरासरी वय सुमारे ३८ वर्षे होते. २२ टक्के लोकांनी चिंताग्रस्त मानसिक परिस्थितीबाबत सांगितले, ज्यात मुख्यत: तणाव, नैराश्य आणि मूड स्विंग अशी लक्षणे होती. आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांना असे आढळले आहे की, लॉकडाऊन दरम्यान सुमारे २५ टक्के लोकांनी तणाव आणि नैराश्य अनुभवले आहे. हा तणाव मानसिक आणि शारीरिक दोन्हीमुळे होता. डॉक्टरांनी आश्वासन दिले असतानाही १५ टक्के लोक याबाबत तणावात होते की, कदाचित ते या व्हायरसने ग्रस्त होऊ नयेत. आरोग्याबाबत हा तणाव ज्यांना पूर्वी आजार होता किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांना जास्त होता. या समूहातील लोकांमध्ये नैराश्यही अधिक दिसून आले.

लेखकांना आढळले की, खराब मानसिक परिस्थिती यावरही अवलंबून होती की, एखाद्या व्यक्तीमध्ये कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता कशी आहे. लेखक म्हणतात की, सद्य परिस्थितीतील आव्हानांचा सामना मानसशास्त्रीय मार्गाने केला जाऊ शकतो. अभ्यासाच्या निष्कर्षात लेखकांनी असे सुचवले आहे की, मानसिकरित्या आधार देण्याने मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो आणि अशा परिस्थितीला सामोरे जाण्यास एखाद्या व्यक्तीला मदत होते. वृद्ध आणि आधीपासून एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात लेखकांनी एक विशेष योजना बनवण्यावर देखील भर दिला आहे, कारण अभ्यासात या लोकांमध्ये नैराश्याच्या सर्वाधिक तक्रारी आढळून आल्या आहेत. यापूर्वीही अनेक अभ्यासांमध्ये महामारी, लॉकडाउन आणि क्वारंटाइनचा लोकांवर कसा वाईट परिणाम होतो हे सांगितले होते. चीनमधील एका अभ्यासानुसार, कोविड-१९ सुरू होण्याच्या पहिल्या महिन्यात सुमारे २५ टक्के लोक मानसिक समस्येने ग्रस्त होते, जे येणाऱ्या महिन्यात निरंतर वाढले.