Coronavirus : नवजात बालकाच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे, आईने मानले आभार तर सर्वांनीकेलं ‘कौतुक’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   संपूर्ण देशात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून वाढणारी संख्या चिंता वाढवत आहे. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून 14 एप्रिलला लॉकडाऊनची मुदत संपणार आहे. मात्र देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. केंद्राने लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्याअधिच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवणार असल्याची घोषणा शनिवारी केली. पंतप्रधान यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीचा आढावा जनतेला सांगताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

राज्यात लॉकडाऊन असल्याने अनेकांचे हाल होत आहेत. खासकरून हातावर पोट असलेल्या मजुरांचे अतोनात हाल होत आहेत. लॉकडाऊन कालावधीत बाहेर पडता येत नसल्याने रुग्णांना देखील रुग्णालयात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच चंद्रपूरच्या एका महिलेच्या नवजात बालकाला घालण्यासाठी कपडेही मिळाले नसल्याने आईने थेट ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर अवघ्या दोन तासात चक्र फिरली. युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने या महिलेशी संपर्क साधत स्थानिक पदाधिकाऱ्यांमर्फत या नवजात बालकाला कपडे पोहचवण्याची सोय केली.

लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापने बंद आहेत. त्यामुळे लहान मुलांची कपड्याची दुकाने देखील बंद आहे. नवजात बालकाच्या अंगावर घालायचे काय ? असा प्रश्न आईला पडला. कोरोनाच्या वाढत्या संकटात बाळाला त्रास होऊ नये यासाठी कपडे खरेदी करणे गरजेचे होते. त्यामुळे पुनम देशपांडे या आईने आपली समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवली. त्यानंतर दोन तासात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही समस्या सोडवून बाळाला कपडे पोहचवण्याची सोय केली. कपड्यांची समस्या सोडवल्याने आईने लगेच आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. त्यामुळे कोरोना संकटकाळात आदित्य ठाकरेंच्या तत्परतेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.